पोपटी..
पोपटी ही पारंपारिक आगरी रेसिपी आहे. जी मुख्यत्वे हिवाळ्यात केली जाते.
मडक्या मधे वालाच्या शेंगा, ,भांबुर्डीचा पाला,अंडी, चिकन, बटाटे असे जिन्नस घालून मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवले जातात, यालाच पोपटी म्हणतात. आपला रायगड जिल्हा विशेषतः अलिबाग, पेण, पनवेल, उरण कडील भाग अशा पोपटी पार्टी साठी प्रसिध्द आहे.
![]() |
Popati |
स्थानिक गावठी वालाच्या शेंगा हया चवीला गोड, चवदार ,
![]() |
वालाच्या शेंगा |
टपोऱ्या दाण्याच्या असतात. व त्या पोटाला बाधत नाही हे विशेष . अशा वालाच्या शेंगा मुख्यतः रायगड जिल्ह्याच्या मातीत पिकत असल्याने रायगड जिल्हा हा पोपटी साठी प्रसिध्द आहे. मुंबई व आजूबाजूच्या शहरातील खवय्ये या पोपटी पार्टी साठी जिल्हयात येत असतात.
वालाच्या शेंगा व भांबुर्डीचा पाला ज्याला स्थानिक बोली भाषेत 'मारभेटी ' असे ही म्हणतात ,हे मुख्य पदार्थ पोपटी साठी वापरले जातात.
भांबुर्डीचा पाला |
पोपटी बनवन्यासाठी लागणारे साहित्य :
वालाच्या शेंगा, भांबुर्डीचा पाला , बटाटे, मीठ, मकयाची कणस.
मांसाहारी पोपटी साठी : अंडी, तिखट मीठ लावून एकजीव केलेल चिकन, आवडीनुसार आणखी काही पदार्थ वापरले जातात.
मातीचे मडके, आगीसाठी लाकडे , मोकळी जागा
![]() |
Popati |
पोपटी बनवण्याची पद्धत :
प्रथम मोठ्या मडक्यामधे तळाला भांबुर्डीचा पाला टाकला जातो, त्यावर वालाच्या शेंगांचा थर लावला जातो. त्यावर आवडीनुसार अंडी, बटाटे, चिकन , मक्याचे कणीस यांचा थर लावला जातो. त्यावर खड्याचे मिठ , तिखट चवीनुसार पसरवला जातो. पुन्हा तसाच थर लावला जातो.
मडके भरल्या नंतर मडक्याचे तोंड भांबुर्डीचा पाल्याने घट्ट बंद केले जाते. तीन दगडांवर मडके उपडे ठेवून चहूबाजूने लाकडे पेटवली जातात. अर्धा ते पाऊण तासात पोपटी शिजून तयार होते.
थंडीच्या दिवसांत रात्री शेकोटी जवळ बसून गरमागरम पोपटी चा आस्वाद घेणे म्हणजे एक वेगळाच आनंद..